Wednesday, July 7, 2010

संगणकावर मराठी युनिकोड

मित्रांनो,

खरेतर हा माझा लेख दुसर्‍या मित्रांच्या ब्लॉग्जवरुन प्रसिद्ध झाला आहे. आता माझा ब्लॉग करायचे म्हटल्यावर तो इथे देणे क्रमपात्रच आहे.

संगणकावर मराठीचा वापर करण्यास तसा ऎंशीच्या दशकाच्या मध्यात सुरु झाला . पण दुर्दैवांने संगणकावर मराठीचा वावर होतांना संगणकावर मराठीचा विकास केवळ छापील मजकूराच्या दिशेनेच झाला. मजकूराची देवाण घेवाण होण्यासाठी आवश्यक असलेले देवनागरी लिपीचे प्रमाणिकीकरण मात्र झाले नाही. किंबहूना याची आवश्यकताच मराठी समाजाला लक्षात आली नाही. संगणकावर मराठीत मजकूर टंकून त्याची छापिल प्रत तयार करणे या अंगानेच संगणकाचा मराठीने वापर केला. मराठीतून माहितीची साठवण, मराठीतून माहितीचे पृथ्करण करणे, माहितीची देवाण घेवाण करणे यासाठी संगणकावरील मराठी प्रमाणिकीकरणाच्या अभावामुळे तयारच झाली नाही. प्रमाणिकाकरणा अभावी मराठीचे टंक करणार्‍या विवीध कंपन्या आपल्या स्वत:चे प्रमाण वापरत आहेत आणि होते आणि हे मराठीसाठी घातक आहे. 2000 सालापासून संगणकावर युनिकोड उपलबद्ध झालेले आहे. मात्र अनेक अडचणी आणि महाराष्ट्र सरकारची अनास्था यामुळे आजही मराठी युनिकोडचा वापर महाराष्ट्रात मराठीसाठी कमी होतो.

फेसबुक ऑरकुट या लोकप्रिय व्यासपिठावर अनेकवेळा मराठी माणसे देवनागरी लिपी ऎवेजी रोमन लिपीमधे मराठीत लिहीतात. काही लोक देवनागरीतून लिहीतात पण त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. फेसबुक ऑरकुट, महाजालावरील विवीध गट अशा वेगवेगळ्या व्यासपीठावरुन अनेकवेळा मराठीतून संगणकावर मजकूर कसा लिहावा (टंकावा) याबद्दल अनेक सल्ले दिले जातात. वेगवेगळ्या साधनांचा वापर करावे असे सुचवले जाते. यात बरहा, जीमेलची लिप्यंतराची (Use of Transliteration or Phonetic keybaord) सुविधा वापरावी असा सल्ला दिला जातो. या सर्व सुविधा वेगवेगळ्या कारणांमुळे उपलबद्ध झाल्या. त्यांचे स्वत:चे असे एक महत्व आहेच मात्र या सुविधा वापरणे म्हणजे तसे द्राविडी प्राणायमच आहेत. मायक्रोसॉफ्टच्या विंडोजवरती मराठी वापरणे अतिशय सुलभ आहे. फक्त याची माहिती संगणक मराठीसाठी वापरणार्‍यांना नसते. मायक्रोसॉफ्टसुद्धा ही माहिती स्वत:हून आवर्जून देत नाही. माझ्यामते ह्याचे कारणही भारतातील मायक्रोसॉफ्ट कार्यलयात काम करणारे भारतीय (इंग्रजी माध्यमात शिकलेले इंग्रज) असावेत. ही माहिती देण्यासाठीच या छोट्या लेखाचे प्रयोजन.

बरहा, जीमेलची सुविधा या पैकी कोणताच वापर न करता मी फेसबुकवर/गुगलवर मराठीतच लिहीत आहे. मी जवळ जवळ इंग्रजीमधे जसे काम करतो तसेच मराठीतही काम करतो आहे.

या माझ्या संगणकावर मी अगदी चक्क नोट पॅडवर मराठी लिहितो. मला त्यात कोणतीच अडचण येत नाही. नोटपॅडवर मराठीत लिहिणे म्हणजे संगणकावर अगदी मूळ पद्धतीत मराठी लिहिणे आणि ती साधी टेक्स्ट फाईल म्हणून साठवता येते. फक्त फाईलचा प्रकार ANSI वरुन बदलून युनिकोड करायला हवा. या साठी खालील गोष्टी करायला हव्यात.

1) संगणकावर मराठी युनिकोड चालू करायला हवे.

2) तुम्हाला इनस्क्रिप्टचा कळ फलक समजून घ्यायला हवा जो तुम्ही 5/10 मिनटात शिकू शकता. कारण तो आपण जसे मराठी हाताने लिहितो तसेच काम करतो. उदा: क कला काना का कानाची कळ स्वतंत्र आहे. शिवाय कळफलकावरची मराठी अक्षरांच्या जागा अगदी तर्कशुद्ध ठिकाणी आहेत. म्हणजे क ला शिफ्ट दाबलेत की ख येतो. या साठीची शिकवणी http://www.ildc.in/Marathi/tools/CyberScape/Type_Assist.zip च्या संकेतस्थळावरती आहे. ती उतरवून घेऊन सवय करता येईल. सध्या ही शिकवणी विंडोज एक्स पी वरतीच फक्त चालते.......सी डॅकला विनंती केली की ती विंडोजच्या नवीन आवृत्तींवरही चालेल असे बघा......करतील तेंव्हा करतील.....

3) मराठीत टंकन करण्याचे 6/7 कळफलक आहेत हा दुर्दैवाचा भाग आहे. अनेकांना वेगवेगळ्या कळफलकांची सवय झालेली असते. ज्यांना हा इनस्क्रिप्ट कळफलक शिकायचा त्रास टाळायचा असेल त्यांच्यासाठी , मायक्रोसॉफ्टच्या भाषाइंडिया संकेत स्थळावरती आय एम ई ही आज्ञावली फुकट ठेवली आहे (http://bhashaindia.com/SiteCollectionDocuments/Downloads/IME/Marathi_IME_Setup.zip), तिचा वापर करता येईल. पण एक लक्षात ठेवायला हवे की ही पळवाट आहे. प्रत्येकाने खरेतर इंस्क्रिप्ट कळफलक जो विंडोज किंवा लिनक्स बरोबर आपोआप येतो त्याच्यावरच टंकन शिकणे चांगले. म्हणजे ज्या संगणकावर आय एम ई नाही तेथे टंकन करणे शक्य होते. नवीन टंकन शिकणार्‍याने त्यावरच सुरुवात करावी. आय एम ई उतरवून आपल्या संगणकावर बसवल्यास 6/7 प्रकारचे कळफलक एकत्र मिळतात. यात फोनेटिक म्हणजे इंग्रजीतून रोमन अक्षराद्वारे मराठी टाईपिंग करु शकणार्‍या कळ फलकांपासून पूर्वी टाईपरायटरचा कळफलक उपलद्ध होता त्याही कळफलकाची सोय आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आय एम ई आज्ञावली द्वारे मिळणारा कोणताही कळ फलक वापरलात तरी अक्षर मराठी युनिकोड मराठीतच असते. या 6/7 कळफलकांचा वापर करुन तुम्ही नोट पॅड पासून सर्व आज्ञावल्यांमधे मराठीत काम करु शकता.

संगणकावर मराठी युनिकोड कसे चालू करावे आणि आय एम ई कसे बसवावे हे सांगणारी चित्रमय शिकवणी मी माझ्या संस्थेच्या संकेत स्थळावर ठेवली आहे. पत्ता असा आहे : http://www.quest.org.in/Unicode/Start_Unicode_English.exe या दुव्यावर गेल्यावर ही शिकवणी उतरवून घेतांना ही EXE फाईल असल्याने ती धोकादायक असल्याचे ब्राऊझर किंवा तुमचा विषाणू रोधक सांगेल त्याकडे दुर्लक्ष करा आणि फाईल उतरवून घ्या. ही फाईल ऍडोबी फ्लॅशमधे केली असल्याने तिच्या बरोबर ती चालणारा प्लेअर त्याच्या बरोबर दिला आहे त्यामुळे ती फाईल .exe झाली आहे. साधारणत: .exe या फाईल्स धोकादायक असल्याचे विषाणू रोधक सांगतात. ह्या फाईल बद्दल काळजी करु नये. प्रथम मी नुसती .swf फाईल ठेवली होती. पण अनेकांनी प्लेयर नसल्याने ती चालत नसल्याचे सांगितले म्हणून सोबत फ्लॅश प्लेयर पण दिला आहे. सदर शिकवणी विंडोज एक्स पी साठी आहे. व्हिस्टा किंवा विंडोज 7 यामधे युनिकोड सी डी वापरुन चालू करावे लागत नाही फक्त Regional and Langauge optinon मधे जाऊन मराठी इंस्क्रिप्ट कळफलक चालू करावा लागतो. आय एम ई वापरायचे असेल तर मार्ग एक्स पी सारखाच आहे.

4) विंडोज बरोबर येणारा मंगल टंक आपण मराठीसाठी वापरतो कारण मराठीसाठी स्वतंत्र टंकच उपलबद्ध नाही. मंगल हिंदीच्या गरजा भागवतो. हा मंगल टंक मराठी लिपीच्या सर्व गरजा भागवत नाही. उदाहरणार्थ क ला क असे जोडून आपण लिहितो तेंव्हा क्क असे मंगल टंकात येते. पण खरे क च्या खाली छोटा क जोडला जायला हवा. म्हणजे क्क असे दिसायला हवे. मंगलमधे ल असा येतो असा वाटीचा ल येत नाही. अश्या अनेक सुधारणा मंगलमधे मराठीसाठी आवश्यक आहेत. याच कारणास्तव मराठी छपाई उद्योग हा टंक वापरत नाही. ते श्री लिपीचे युनिकोड अप्रमाणित टंक वापरतात. या अप्रमाणित टंकाद्वारे छापाई उद्योगाची छपाईची गरज भागते आणि त्यात ते खूश आहेत. पण मराठीतून माहितीची देवाण घेवाण संगणकावर करणे, साठवणूक करणे, प्रक्रिया करणे यात खूपच अडचणी येतात. मी येथे या लेखासाठी Sanskrit 2003 हा ओमकारानंद आश्रम हिमालय यांनी बनवलेला टंक वापरत आहे (http://www.omkarananda-ashram.org/Sanskrit/sanskrit2003.zip). हा टंक मराठीच्या खूपशा गरजा पुर्‍या करतो पण त्यातही मराठीसाठी खास सुधारणा करायला हव्या आहेत. तो मुळात संस्कृतसाठी तयार केला आहे. मराठीसाठी नव्हे. महाराष्ट्र सरकारने स्वत: पुढाकार घेऊन हे करायला हवे. या पॅरेग्राफ मधील क किंवा ल नेमका कसा दिसायला हवा हे पहायचे असेल तर Sanskrit 2003 वरील पत्त्यावरुन उतरवून घ्या म्हणजे हा लेख अगदी बरोबर दिसेल.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे मंगल किंवा वरील Sanskrit 2003 मधे केलेले तुमचे काम जर नवीन युनिकोड मराठी टंक उपलबद्ध झाला तर फुकट जाणार नाही किंवा दुसर्‍या संगणकावर दिसणारच नाही असे होत नाही. आज हे काम शिवाजी सारख्या अप्रमाणित टंकात केल्यावर काहीवेळा फुकट जाते किंवा ते युनिकोडमधे पालटवून घ्यावे लागते. आपण एकदा युनिकोडमधून मजकूर केलात तर मग मराठीसाठीचा दुसरा कोणताही टंक भविष्यात तयार झाला तरी काही अडचण येणार नाही. हेच तर युनिकोड मराठी प्रमाणित फॉंटमधे लिहिण्याचे महत्व आहे.

काही अडचण असल्यास मला इमेलवर कळवा.


जाता जाता: http://www.quest.org.in/ या माझ्या संस्थेच्या संकेत स्थळावरती मी ड्रुपल वापरुन इंग्रजी आणि मराठी संकेतस्थळ एकाचा ठिकाणी केले आहे. 

No comments:

Post a Comment