Monday, December 27, 2010

शुभानन गांगलांची ‘सोप्पी मराठी’ ...मराठीचे एक अवघड प्रकरण

ङा लेख पुणे सकाळ मधे ऑगस्ट 2010 मधे प्रसिद्ध झाला होता

गेली दोन-तीन वर्षे शुभानन गांगल यांनी ‘शुद्धलेखनाचे शून्य नियम’ व ‘गांगल फाँट’ या त्यांच्या दोन ‘पेटंट’ विचारांनी भाषाविज्ञान व संगणक क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांना उबग आणला आहे. यापूर्वी त्यांच्या ‘शुद्धलेखनाचे शून्य नियम’ या पुस्तिकेतील विचारांना ज्येष्ठ भाषावैज्ञानिक प्रा० मिलिंद मालशे यांनी अभ्यासकीय प्रतिवादाने उघडे पाडले होते. असेच ‘अतिक्रमण’ शुभानन गांगल यांनी ‘संगणक व मराठी’ या विषयाच्या बाबतीतही गेले काही वर्षं सुरू केले आहे. ‘सोप्पी मराठी’च्या नावाखाली संगणकावर मराठीसाठी जे अवघड व न पचणारे विचार ते मांडत आहेत ते व्यक्तिश: तपासूनच हा प्रतिवाद केला आहे. शुभानन गांगलांमुळे मराठी युनिकोडच्या महाराष्ट्रातील वाढत्या प्रसाराला बाधा पोचत असल्याने व लोकांची विनाकारण दिशाभूल होत असल्याने हे करणे आम्हाला भाग पडत आहे.
सोप्पी मराठी’ या आपल्या उत्पादनाचे ‘मार्केटिंग’ करताना शुभानन गांगल आपला ‘युनिकोड गांगल टंक’ आणि ‘फोनेटिक कीबोर्ड ड्रायव्हर’ देतात. काही महिन्यांपूर्वीपर्यंत याच गांगलांना जगाने मान्य केलेल्या युनिकोडचे वावडे होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी जेव्हा पहिल्यांदा ‘गांगल टंक’ बनवला तेव्हा तो युनिकोड प्रमाणित नव्हता. तेव्हादेखील ‘गांगल फाँट हा युनिकोडपेक्षाही सरस आहे’ व ‘युनिकोडमुळे मराठीचे वाटोळे होणार आहे’ या त्यांच्या विधानांचा अर्थ संगणक तज्ज्ञांना कधीच कळला नव्हता (असेच काहीसे प्रा० मालशे यांचे शुद्धलेखनाच्या बाबतीत झाले असावे) .
काही दिवसांपूर्वीच, शुभानन गांगल यांनी दिनांक २८ मे २००८ रोजी गुगल लॅबला त्यांचा गांगल टंक वापरण्याचे केलेले आवाहन वाचनात आले. त्याला उत्तर देताना केदार पाटील या गुगल संबंधित व्यक्तीने “तुमचा फाँट तपासला असता तुम्ही युनिकोड मानक वापरत नसल्यामुळे तो गुगलला वापरता येण्याजोगा नाही. तो वापरला तर आपण पुन्हा मागच्या काळात जाऊन मागासलेले राहू” असे सांगितले आहे. (संदर्भ: http://groups.google.com/group/google-india-labs/browse_thread/thread/fcef24b18c4a5866 )
खुद्द गुगलसारख्या महाजालावर वर्चस्व असणार्‍या कंपनीने युनिकोडचा आग्रह धरला तरीदेखील गांगल यांनी आपला ‘गांगल फाँट’ युनिकोडमध्ये आणला नव्हता. नुकत्याच झालेल्या पुणे येथील साहित्य संमेलनात मराठी अभ्यास केंद्राने ‘युनिकोड व संगणकावर मराठीचा वापर’ ही पुस्तिका व त्यावर सादरीकरण ठेवले होते. त्यावेळेस वाद घालताना शुभानन गांगल यांनी ‘युनिकोडला तुम्ही सर्वश्रेष्ठ का मानता’ वगैरे ‘मौलिक’ विचार मांडले होते. वरून ‘माझे अभिनव संशोधन कळायला तुम्हाला वेळ लागेल’ अशी पुस्तीही जोडली होती.
अशा प्रकारे इतकी वर्षे युनिकोडला नावे ठेवणार्‍या शुभानन गांगलांनी आता एकदम युनिकोडची जपमाळ ओढायला सुरूवात केली आहे. ध्यानीमनी नसताना अचानक एके दिवशी त्यांच्या ‘गांगल फाँट’चे ‘गांगल युनिकोड फाँट’ असे बारसे झालेले पाहण्यात आले. युनिकोडमध्ये नसलेल्या कोणत्याही फाँटला शासनाने मंत्रालयाचे दरवाजे बंद केल्यामुळे त्यांना नैराश्य आले, की युनिकोडला पर्याय नाही हे सत्य त्यांनी मान्य केले हे कळायला मार्ग नाही.
हरतर्‍हेने युनिकोडची हेटाळणी करून अपयश आल्यावर शुभानन गांगल आता साळसूदपणे मराठी युनिकोड टंक लोकांना ‘मोबदला’ घेऊन देत आहेत. संगणकावर मराठी वापरण्यासाठी ते जी ‘सोप्पी मराठी’ देतात, ते म्हणजे दुसरे काहीही नसून त्यांच्या आधीच्याच गांगल फाँटची युनिकोड आवृत्ती आहे. पण त्यांच्या माहिती पुस्तिकेत मात्र ते ‘मराठी युनिकोड टंक नाही ते टूल आहे’ असे सांगतात. ह्या टंकासाठी ते १०० रुपयांची मागणी करतात आणि ‘विकत घेतले’ तरच आपले टूल तुम्हाला मराठी युनिकोड वापरायला देईल असे सांगतात. यासोबत टायपिंगच्या दोन पद्धती मिळतील असेही ते लिहितात. या दोन पद्धती म्हणजे इन्स्क्रिप्ट कळफलक किंवा आपला स्वतःचा फोनेटिक कळफलक. इन्स्क्रिप्ट कळफलक संगणकातच by default बसवलेला असतो. फोनेटिकची सोय तर बरहा, गुगलचे ट्रान्स्लिटरेशन टूल, मायक्रोसॉफ्टचे आयएमई यांनी मोफतच दिली आहे. मायक्रोसॉफ्टकडून मिळणारे सहा-सात युनिकोड टंक आणि सीडॅकने दिलेलेही अनेक युनिकोड टंक मोफत उपलब्ध असताना सामान्य दिसणार्‍या गांगल फाँटसाठी एक रुपयाही मोजणे म्हणजे खरेतर पैशाचा अपव्यय आहे. हे म्हणजे परसदारात ताजा भाजीपाला उगवत असतानाही पायपीट करून शिळी भाजी विकत आणण्यासारखे झाले. वास्तव असे आहे की शासकीय अनास्थेमुळे व विषयाचे गांभीर्य नसल्यामुळे अधिकृत मराठी वर्णमालेशी सुसंगत असे आकर्षक युनिकोड टंक संख्येने तसे मर्यादित आहेत. तेदेखील मायक्रोसॉफ्ट, महाजाल व सी-डॅक अशांमध्ये विखुरले गेले आहेत. त्यातील टंकांमध्ये लहान-सहान दोष असतीलही, मात्र आजच्या घडीला ते मराठीची संगणकावरील टंकलेखनाची गरज यथास्थित भागवत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व टंक विनामूल्य आहेत. तरीदेखील परिपूर्ण व आकर्षक युनिकोड टंक तयार करण्यासाठी कोणी तज्ज्ञाने पुढाकार घेतला तर त्याचे स्वागतच होईल. गांगलांचा टंक त्यादृष्टीने चांगला असता तरी गोष्ट वेगळी होती. मात्र मुळात वळण व आकर्षकतेच्या दृष्टिकोनातून गांगलांचा सध्याचा युनिकोड टंक अतिसामान्य आहे. खरेतर नाममात्र त्रुटी असलेल्या युनिकोड टंकांकडे बोट दाखवूनच इतकी वर्षं गांगल त्यांच्या अयुनिकोड फाँटची ‘शास्त्रशुद्धता’ लोकांना दाखवून देत होते. आता त्यालाच युनिकोड टंकाचे आवरण चढवल्यावर ‘जसे ओठांनी लिहावे..तसे कागदावरच्या शाईला बोलता यावे..जिभेच्या टोकावर‍ असलेल्या मराठीने..संगणकात बोटांच्या टोकातून झिर‍पावे’ असे अर्थहीन काव्य रचून ते स्वानंद घेताहेत.

सोप्पी मराठी’ सोबत शुभानन गांगल देत असलेल्या माहिती पुस्तिकांबद्दल
  1. "How to setup Unicode Devanagari in the system” या माहिती पुस्तिकेत गांगलांनी ‘युनिकोड हिंदी चालू करा’ असे म्हटलेले आहे. ‘येथे दिसणारे HI म्हणजे मराठी नव्हे तर ‘सोप्पी मराठी’तून मिळणार्‍या निळ्या ‘अ’ मधून युनिकोड मराठी काम करते. तुम्ही पैसे दिल्यावर हा निळा ‘अ’ चालू होईल’ अशी माहिती ते देतात.
आता हे मात्र संतापजनक आहे. मराठी युनिकोडचा पर्याय असतानादेखील ‘हिंदी चालू करा’ असे सांगून त्याच्यामार्फत ‘सोप्पी मराठी’ हे आपले सॉफ्टवेअर गळी उतरवण्याचा गांगलांचा प्रयत्न चीड आणणारा आहे. जर युनिकोडची निर्मिती करणार्‍यांना हिंदी म्हणजेच मराठी असे अभिप्रेत असते तर त्यांनी मराठीचा वेगळा पर्याय दिलाच नसता. त्याचबरोबर ऑपरेटिंग सिस्टम तयार करणार्‍या जगातील प्रमुख संगणक कंपन्यांनी (उदा० मायक्रोसॉफ्ट, रेड हॅट इ०) युनिकोड देताना हिंदी आणि मराठी असे दोन वेगळे पर्याय देवनागरी लिपी वापरण्यासाठी दिलेले आहेत. सर्वसामान्यांना हे माहिती नसल्याने मराठी युनिकोडचा संगणकातील पर्याय दडवून ठेऊन ‘सोप्पी मराठी’ पुढे रेटणे गांगलांना शक्य झाले आहे. हिंदीच्या तव्यावर आपल्या मराठी सॉफ्टवेअरची पोळी भाजण्याचा त्यांचा हा डाव निषेधार्ह आहे.
  1. ‘Soppi Marathi User guide’ या फाईलमधे ते मराठी युनिकोड हे त्यांचे टूल आहे असे बिनदिक्कत म्हणतात. खरं पाहाता ते मराठी युनिकोड मानक मानणारे एक टंकन टूल (कीबोर्ड ड्रायव्हर) आहे. त्यानंतर ते मराठी युनिकोडचे फायदे सांगतात (जे दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांनाच मान्य नव्हते हा भाग वेगळा) हे फायदे सांगतानाही मराठी युनिकोड जणू त्यांचेच उत्पादन आहे अशी मांडणी ते करतात व सर्व प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टमध्ये मराठी युनिकोड येतेच हे लपवतात; या खोटारडेपणाला काय म्हणावे ?
  2. फोनेटिक कीबोर्डबद्दल गांगलांना विशेष ममत्व असल्यामुळे केंद्रशासनमान्य व सर्व संगणकांवर by default असलेल्या इन्स्क्रिप्टच्या कीबोर्डबद्दल ते मुद्दामहून फारशी माहिती देत नाहीत. इन्स्क्रिप्टचा कळफलक हा मायक्रोसॉफ्टपासून लिनक्सपर्यंत सर्वांनीच आपल्या ऑपरेटिंग सिस्टममधून दिला आहे. त्यात श्रेय घेण्यास कुठेच वाव नसल्याची लख्ख जाणीव असल्यामुळेच गांगल धूर्तपणे इंग्रजी स्पेलिंगवर आधारलेल्या फोनेटिककडे झुकलेले दिसतात. मात्र जगातील अनेक देशांत कळफलकांवर त्या देशाची भाषा व इंग्रजी अशी द्वैभाषिक रचना असते. जग फिरलेल्या शुभानन गांगलांना हे चांगलेच माहीत असावे. तरीदेखील मराठीच्या बाबतीत ते फोनेटिकची भलामण करतात. केंद्र व राज्यशासनाने इन्स्क्रिप्टचा द्वैभाषिक कळफलक सर्व संगणकांवर अनिवार्य असण्याची कोणतीच व्यवस्था निर्माण न केल्यामुळे गांगलांसारख्या फोनेटिकचा उदोउदो करणार्‍यांचे फावते.
  3. याच पुस्तिकेतील ‘रोमन लिपीच्या आधारे मराठी ग्लोबल करणे’, ‘संगणकाच्या आधारे मराठीने संगणकाचे विश्व काबीज केले आहे’ वगैरे अनेक मुद्दे निव्वळ असंबद्ध व बाष्कळ म्हणून दुर्लक्ष करायला हवेत; नाहीतर त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी एक पुस्तिकाच लिहावी लागेल.
श्री० शुभानन गांगलांनी मांडलेले अनेक मुद्दे हे तद्दन अशास्त्रीय किंवा दिशाभूल करणारे असतात हे याआधीच मिलिंद मालशेसारख्यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. बहुजन समाजातील काही नेत्यांना गांगलांची ‘शुद्धलेखन हटाव’ पद्धती सोयीची वाटते. खरेतर संगणकाच्या जादुई दुनियेत प्रमाण लेखनाची अडचण संगणकीय शब्दकोशामुळे सहज सुटते. संगणकावर लेखन करताना त्यात होणार्‍या प्रमाण लेखनाच्या व्याकरण व शुद्धलेखनदृष्ट्या त्रुटी सॉफ्टवेअरवर दाखवून पर्याय सुचवण्याची सोय इंग्रजीसाठी उपलब्ध आहे. तशीच सोय मराठीसाठीही करणे हा खरा उपाय आहे. उगीचच जातीयतावादी दृष्टिकोनातून प्रमाण लेखनावर आगपाखड करून गांगल या विषयाला चुकीचे वळण देत आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही टंकामुळे लेखनपद्धतीत बदल होत नसतो. फारफार तर तो टंक तयार करताना त्याचे वळण वर्णमालेशी सुसंगत आहे का एवढेच पाहता येऊ शकते. त्याचा संगणकावरील विशिष्ट पद्धतीने वापर करण्यासाठी शुद्धलेखन तपासनीस (spell-checker) व शब्दकोशाचेच साहाय्य घ्यावे लागते. त्याचप्रमाणे गांगलांचा टंकही ‘शुद्धलेखनाचे शून्य नियम’ असा चमत्कार तो वापरताना घडवून आणू शकत नाही. अर्थात ज्यांना याची समज नाही त्यांना ‘गिर्‍हाईक’ बनवूनच इतके वर्ष गांगलांनी स्वयंघोषित तज्ज्ञतआणली आहे हा भाग निराळा.
संगणकीय तंत्रज्ञानाचा पसारा अफाट आहे. त्यात असंख्य बारकावे आहेत व सर्वसामान्य माणसाला त्याची फारशी माहिती नसते. त्याचाच (गैर) फायदा घेताना साखरभाषा वापरून, मराठीच्या भल्याचा कांगावा करत व क्रांतिकारक संशोधकाचा झगा पांघरून शुभानन गांगल संगणकीय मराठीच्या विकासाचे अतोनात नुकसान करत आहेत अशी आमची धारणा आहे. याबाबत त्यांना वेळोवेळी अनेकांनी सांगूनही त्यांनी आपला हेका सोडलेला नाही. निखालस खोटी व घोटाळेबाज माहिती देऊन आणि लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून ते मराठीच्या भल्याचा जो आव आणत आहेत त्याला आमचा आक्षेप आहे. जर शुभानन गांगलांना खरेच मराठीचे भले व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी निरर्थक बुवाबाजी थांबवावी अशी त्यांना आग्रहाची विनंती. सुज्ञास अधिक सांगणे न लगे !
नितीन निमकर
स्वप्नील हजारे. 
हा  लेख 'सकाळ' वृत्तपत्रात शुक्रवार 6ऑगस्ट 2010 रोजी त्यांच्या मुंबई आवृत्तीत प्रसिद्ध झाला होता.  त्या लेखाचा दुवा : http://72.78.249.107/Sakal/6Aug2010/Normal/Mumbai/page2.htm

Wednesday, July 7, 2010

संगणकावर मराठी युनिकोड

मित्रांनो,

खरेतर हा माझा लेख दुसर्‍या मित्रांच्या ब्लॉग्जवरुन प्रसिद्ध झाला आहे. आता माझा ब्लॉग करायचे म्हटल्यावर तो इथे देणे क्रमपात्रच आहे.

संगणकावर मराठीचा वापर करण्यास तसा ऎंशीच्या दशकाच्या मध्यात सुरु झाला . पण दुर्दैवांने संगणकावर मराठीचा वावर होतांना संगणकावर मराठीचा विकास केवळ छापील मजकूराच्या दिशेनेच झाला. मजकूराची देवाण घेवाण होण्यासाठी आवश्यक असलेले देवनागरी लिपीचे प्रमाणिकीकरण मात्र झाले नाही. किंबहूना याची आवश्यकताच मराठी समाजाला लक्षात आली नाही. संगणकावर मराठीत मजकूर टंकून त्याची छापिल प्रत तयार करणे या अंगानेच संगणकाचा मराठीने वापर केला. मराठीतून माहितीची साठवण, मराठीतून माहितीचे पृथ्करण करणे, माहितीची देवाण घेवाण करणे यासाठी संगणकावरील मराठी प्रमाणिकीकरणाच्या अभावामुळे तयारच झाली नाही. प्रमाणिकाकरणा अभावी मराठीचे टंक करणार्‍या विवीध कंपन्या आपल्या स्वत:चे प्रमाण वापरत आहेत आणि होते आणि हे मराठीसाठी घातक आहे. 2000 सालापासून संगणकावर युनिकोड उपलबद्ध झालेले आहे. मात्र अनेक अडचणी आणि महाराष्ट्र सरकारची अनास्था यामुळे आजही मराठी युनिकोडचा वापर महाराष्ट्रात मराठीसाठी कमी होतो.

फेसबुक ऑरकुट या लोकप्रिय व्यासपिठावर अनेकवेळा मराठी माणसे देवनागरी लिपी ऎवेजी रोमन लिपीमधे मराठीत लिहीतात. काही लोक देवनागरीतून लिहीतात पण त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. फेसबुक ऑरकुट, महाजालावरील विवीध गट अशा वेगवेगळ्या व्यासपीठावरुन अनेकवेळा मराठीतून संगणकावर मजकूर कसा लिहावा (टंकावा) याबद्दल अनेक सल्ले दिले जातात. वेगवेगळ्या साधनांचा वापर करावे असे सुचवले जाते. यात बरहा, जीमेलची लिप्यंतराची (Use of Transliteration or Phonetic keybaord) सुविधा वापरावी असा सल्ला दिला जातो. या सर्व सुविधा वेगवेगळ्या कारणांमुळे उपलबद्ध झाल्या. त्यांचे स्वत:चे असे एक महत्व आहेच मात्र या सुविधा वापरणे म्हणजे तसे द्राविडी प्राणायमच आहेत. मायक्रोसॉफ्टच्या विंडोजवरती मराठी वापरणे अतिशय सुलभ आहे. फक्त याची माहिती संगणक मराठीसाठी वापरणार्‍यांना नसते. मायक्रोसॉफ्टसुद्धा ही माहिती स्वत:हून आवर्जून देत नाही. माझ्यामते ह्याचे कारणही भारतातील मायक्रोसॉफ्ट कार्यलयात काम करणारे भारतीय (इंग्रजी माध्यमात शिकलेले इंग्रज) असावेत. ही माहिती देण्यासाठीच या छोट्या लेखाचे प्रयोजन.

बरहा, जीमेलची सुविधा या पैकी कोणताच वापर न करता मी फेसबुकवर/गुगलवर मराठीतच लिहीत आहे. मी जवळ जवळ इंग्रजीमधे जसे काम करतो तसेच मराठीतही काम करतो आहे.

या माझ्या संगणकावर मी अगदी चक्क नोट पॅडवर मराठी लिहितो. मला त्यात कोणतीच अडचण येत नाही. नोटपॅडवर मराठीत लिहिणे म्हणजे संगणकावर अगदी मूळ पद्धतीत मराठी लिहिणे आणि ती साधी टेक्स्ट फाईल म्हणून साठवता येते. फक्त फाईलचा प्रकार ANSI वरुन बदलून युनिकोड करायला हवा. या साठी खालील गोष्टी करायला हव्यात.

1) संगणकावर मराठी युनिकोड चालू करायला हवे.

2) तुम्हाला इनस्क्रिप्टचा कळ फलक समजून घ्यायला हवा जो तुम्ही 5/10 मिनटात शिकू शकता. कारण तो आपण जसे मराठी हाताने लिहितो तसेच काम करतो. उदा: क कला काना का कानाची कळ स्वतंत्र आहे. शिवाय कळफलकावरची मराठी अक्षरांच्या जागा अगदी तर्कशुद्ध ठिकाणी आहेत. म्हणजे क ला शिफ्ट दाबलेत की ख येतो. या साठीची शिकवणी http://www.ildc.in/Marathi/tools/CyberScape/Type_Assist.zip च्या संकेतस्थळावरती आहे. ती उतरवून घेऊन सवय करता येईल. सध्या ही शिकवणी विंडोज एक्स पी वरतीच फक्त चालते.......सी डॅकला विनंती केली की ती विंडोजच्या नवीन आवृत्तींवरही चालेल असे बघा......करतील तेंव्हा करतील.....

3) मराठीत टंकन करण्याचे 6/7 कळफलक आहेत हा दुर्दैवाचा भाग आहे. अनेकांना वेगवेगळ्या कळफलकांची सवय झालेली असते. ज्यांना हा इनस्क्रिप्ट कळफलक शिकायचा त्रास टाळायचा असेल त्यांच्यासाठी , मायक्रोसॉफ्टच्या भाषाइंडिया संकेत स्थळावरती आय एम ई ही आज्ञावली फुकट ठेवली आहे (http://bhashaindia.com/SiteCollectionDocuments/Downloads/IME/Marathi_IME_Setup.zip), तिचा वापर करता येईल. पण एक लक्षात ठेवायला हवे की ही पळवाट आहे. प्रत्येकाने खरेतर इंस्क्रिप्ट कळफलक जो विंडोज किंवा लिनक्स बरोबर आपोआप येतो त्याच्यावरच टंकन शिकणे चांगले. म्हणजे ज्या संगणकावर आय एम ई नाही तेथे टंकन करणे शक्य होते. नवीन टंकन शिकणार्‍याने त्यावरच सुरुवात करावी. आय एम ई उतरवून आपल्या संगणकावर बसवल्यास 6/7 प्रकारचे कळफलक एकत्र मिळतात. यात फोनेटिक म्हणजे इंग्रजीतून रोमन अक्षराद्वारे मराठी टाईपिंग करु शकणार्‍या कळ फलकांपासून पूर्वी टाईपरायटरचा कळफलक उपलद्ध होता त्याही कळफलकाची सोय आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आय एम ई आज्ञावली द्वारे मिळणारा कोणताही कळ फलक वापरलात तरी अक्षर मराठी युनिकोड मराठीतच असते. या 6/7 कळफलकांचा वापर करुन तुम्ही नोट पॅड पासून सर्व आज्ञावल्यांमधे मराठीत काम करु शकता.

संगणकावर मराठी युनिकोड कसे चालू करावे आणि आय एम ई कसे बसवावे हे सांगणारी चित्रमय शिकवणी मी माझ्या संस्थेच्या संकेत स्थळावर ठेवली आहे. पत्ता असा आहे : http://www.quest.org.in/Unicode/Start_Unicode_English.exe या दुव्यावर गेल्यावर ही शिकवणी उतरवून घेतांना ही EXE फाईल असल्याने ती धोकादायक असल्याचे ब्राऊझर किंवा तुमचा विषाणू रोधक सांगेल त्याकडे दुर्लक्ष करा आणि फाईल उतरवून घ्या. ही फाईल ऍडोबी फ्लॅशमधे केली असल्याने तिच्या बरोबर ती चालणारा प्लेअर त्याच्या बरोबर दिला आहे त्यामुळे ती फाईल .exe झाली आहे. साधारणत: .exe या फाईल्स धोकादायक असल्याचे विषाणू रोधक सांगतात. ह्या फाईल बद्दल काळजी करु नये. प्रथम मी नुसती .swf फाईल ठेवली होती. पण अनेकांनी प्लेयर नसल्याने ती चालत नसल्याचे सांगितले म्हणून सोबत फ्लॅश प्लेयर पण दिला आहे. सदर शिकवणी विंडोज एक्स पी साठी आहे. व्हिस्टा किंवा विंडोज 7 यामधे युनिकोड सी डी वापरुन चालू करावे लागत नाही फक्त Regional and Langauge optinon मधे जाऊन मराठी इंस्क्रिप्ट कळफलक चालू करावा लागतो. आय एम ई वापरायचे असेल तर मार्ग एक्स पी सारखाच आहे.

4) विंडोज बरोबर येणारा मंगल टंक आपण मराठीसाठी वापरतो कारण मराठीसाठी स्वतंत्र टंकच उपलबद्ध नाही. मंगल हिंदीच्या गरजा भागवतो. हा मंगल टंक मराठी लिपीच्या सर्व गरजा भागवत नाही. उदाहरणार्थ क ला क असे जोडून आपण लिहितो तेंव्हा क्क असे मंगल टंकात येते. पण खरे क च्या खाली छोटा क जोडला जायला हवा. म्हणजे क्क असे दिसायला हवे. मंगलमधे ल असा येतो असा वाटीचा ल येत नाही. अश्या अनेक सुधारणा मंगलमधे मराठीसाठी आवश्यक आहेत. याच कारणास्तव मराठी छपाई उद्योग हा टंक वापरत नाही. ते श्री लिपीचे युनिकोड अप्रमाणित टंक वापरतात. या अप्रमाणित टंकाद्वारे छापाई उद्योगाची छपाईची गरज भागते आणि त्यात ते खूश आहेत. पण मराठीतून माहितीची देवाण घेवाण संगणकावर करणे, साठवणूक करणे, प्रक्रिया करणे यात खूपच अडचणी येतात. मी येथे या लेखासाठी Sanskrit 2003 हा ओमकारानंद आश्रम हिमालय यांनी बनवलेला टंक वापरत आहे (http://www.omkarananda-ashram.org/Sanskrit/sanskrit2003.zip). हा टंक मराठीच्या खूपशा गरजा पुर्‍या करतो पण त्यातही मराठीसाठी खास सुधारणा करायला हव्या आहेत. तो मुळात संस्कृतसाठी तयार केला आहे. मराठीसाठी नव्हे. महाराष्ट्र सरकारने स्वत: पुढाकार घेऊन हे करायला हवे. या पॅरेग्राफ मधील क किंवा ल नेमका कसा दिसायला हवा हे पहायचे असेल तर Sanskrit 2003 वरील पत्त्यावरुन उतरवून घ्या म्हणजे हा लेख अगदी बरोबर दिसेल.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे मंगल किंवा वरील Sanskrit 2003 मधे केलेले तुमचे काम जर नवीन युनिकोड मराठी टंक उपलबद्ध झाला तर फुकट जाणार नाही किंवा दुसर्‍या संगणकावर दिसणारच नाही असे होत नाही. आज हे काम शिवाजी सारख्या अप्रमाणित टंकात केल्यावर काहीवेळा फुकट जाते किंवा ते युनिकोडमधे पालटवून घ्यावे लागते. आपण एकदा युनिकोडमधून मजकूर केलात तर मग मराठीसाठीचा दुसरा कोणताही टंक भविष्यात तयार झाला तरी काही अडचण येणार नाही. हेच तर युनिकोड मराठी प्रमाणित फॉंटमधे लिहिण्याचे महत्व आहे.

काही अडचण असल्यास मला इमेलवर कळवा.


जाता जाता: http://www.quest.org.in/ या माझ्या संस्थेच्या संकेत स्थळावरती मी ड्रुपल वापरुन इंग्रजी आणि मराठी संकेतस्थळ एकाचा ठिकाणी केले आहे.